भारतासह जगभरातील शेतकरी ‘रस्त्यावर’ का आले?

  • Home
  • Marathi Blogs
  • भारतासह जगभरातील शेतकरी ‘रस्त्यावर’ का आले?

डॉ. राजेंद्र शेंडे (shende.rajendra@gmail.com)

दिल्लीच्या सीमेवर सध्या शेतकऱ्यांनी डेरा टाकला आहे. केवळ भारतच नाही तर इटली, पोलंड, नेदरलँड, जर्मनी, स्पेन, फ्रान्स अशा अनेक देशात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. दिवसरात्र कष्ट करणारा बळीराजा असा थेट रस्त्यावर का आणि कसा आला? तत्काळ आणि दीर्घकालीन उपाय काय आहेत? हे जाणून घेणे आवश्यक आहे. 

मथळा वाचून चक्रावलात ना? कारण, ‘रस्त्यावर’ येणे याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे आंदोलनासाठी रस्त्यावर येणे आणि दुसरे म्हणजे देशोधडीला लागणे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सध्या दोन्हीही अर्थ लागू पडतात. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो प्रत्यक्ष शेतात राबतो. थेट आंदोलक होणे ही बाब शेतकऱ्याला लागूच होत नाही. भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेजारी राज्यांचे शेतकरी जमले आहेत. ट्रॅक्टर, ट्रकसह विविध वाहनांद्वारे त्यांनी राजधानीलाच जणू वेढा घातला आहे. त्याचबरोबर युरोपमधील इटली, स्पेन, बेल्जिअम आणि फ्रान्समध्ये तर ट्रॅक्टर्सच्या काही किलोमीटरच्या रांगा दिसत आहेत. तेथील शेतकरीही आंदोलन करीत आहेत. २०२३मधील एका अहवालानुसार, जगातील तब्बल ७० टक्के देशांमध्ये शेतकरी निदर्शने करीत आहेत. पाकिस्तान असो की बांगलादेश किंवा अन्य कुठलाही आशियाई, युरोपीय व अफ्रिका खंडातील देश. सर्वत्र स्थिती थोड्या फार प्रमाणात सारखीच आहे. रशिया-युक्रेन किंवा इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धामुळे हे होते आहे का? की हवामान बदल आणि जागतिक उष्मावाढीचे संकट कारणीभूत आहे? की हा केवळ योगयायोग आहे? 
कृषी ही एक मोठी आणि महत्त्वाची आर्थिक नाही तर सामाजिक व्यवस्था आहे. कारण, मानव समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी जे अन्नधान्य लागते ते याच क्षेत्रातून येते. असे असतानाही ज्या क्षेत्रातून अन्नधान्याचा पुरवठा होतो किंवा ते पिकविले जाते तेच कसे काय अडचणीत येऊ शकते? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण अनेकानेक बाबींचा शोध लावला. त्यातून अनेक क्षेत्रे विकसित झाली. सेवा, वाहतूक, बांधकाम, व्यवसाय, उद्योग आदी. या क्षेत्रांमध्ये देखील उद्रेक होतात, पण अत्यंत प्राथमिक आणि मानवी गरजांचा पाया असलेल्या कृषी क्षेत्रात असे का होते आहे?


याचे मूळ शोधायचे म्हटले तर आपल्याला भूगर्भापासून थेट आकाशाकडेही पहावे लागेल! एक तर शेती ही हवामान आधारीत आहे. हवामानामुळेच शेतजमिनीची स्थितीही बदलत असते. हवामान हा निसर्गाचाच एक भाग आहे आणि त्याचे संतुलन निसर्गाच्या वेगवेगळ्या चक्रांवर अवलंबून आहे. जसे की जलचक्र, कार्बनचक्र. विविध आणि स्वैर अशा मानवी कृत्यांमुळे ही चक्रे बाधित झाली आहेत. वातावरणामधील कार्बन डाय ऑक्साईड, मिथेनसह हरित गृह वायूंचे उत्सर्जन या चक्रांना अनियमित करीत आहे. परिणामी, या वायूंचे वातावरणातील प्रमाण निसर्ग चक्रापेक्षा अधिक झाल्याने पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तपमान वाढते आहे. म्हणजेच, नैसर्गिक चक्राला आपण थेट बाधा पोहचवत आहोत. यातूनच मग, ढगफुटी, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस अशी नैसर्गिक संकटे येत आहेत. गेल्या काही दशकात तर या संकटांच्या वारंवरता आणि तीव्रतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लहरी हवामानाचा थेट आणि मोठा फटका कृषी क्षेत्राला बसतो आहे. त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अनेकदा हिरावून घेतला जातो. अनेकदा उत्पादन चांगले येत नाही किंवा उत्पन्न मिळत नाही. खर्चाच्या तुलनेत मिळणारी रक्कम तोकडी असते. यातून शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. 
पूर्वीसारखा शेतजमिनीचा पोत चांगला राहिलेला नाही. हवामान बदलामुळे विविध किडे आणि किटकांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. परिणामी, रासायनिक औषधे आणि खतांची मात्रा देणे किंवा वाढवणे अत्यावश्यक बनते. याचा शेतपिकांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. शेतीचा खर्चही वाढतो. आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे बाजारातील शेतमालाचे दर बदलतात. त्यामुळे खर्च आणि आवक यांचे प्रमाण असंतुलित बनते.


कृषी समस्यांना काही सामाजिक कारणेही आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. आता विभक्त आहे. त्यामुळे शेतीची विभागणी झाली. यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले. भारतातील सर्वेक्षणानुसार, २ हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण तब्बल ८९.४ टक्के एवढे आहे. परिणामी, शेतीच्या उत्पादन आणि उत्पन्न यांचा ताळमेळही बिघडला आहे.
शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस हा हक्काचा स्त्रोत असला तरी तो बेभरवशाचा झाला आहे. ते अनेकदा लांबतो, कधी बरसतच नाही आणि आला तरी महिन्याभराचा एकदाच कोसळतो. दोन पावसातील अंतर (ड्राय स्पेल) वाढते आहे. कधी तो अवकाळी असतो. ही सुद्धा चिंतेची बाब आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे जलस्त्रोतांवर परिणाम होते. लोकसंख्यावाढीमुळे जलस्त्रोतांवरील ताण वाढला. याचा शेतीच्या पाणी उपलब्धतेवर मोठा परिणाम झाला. पाऊस आणि जलस्त्रोतांनतर अतिशय आक्रमकपणे सर्वांचा मोर्चा भूजलाकडे वळला आहे. बोअरवेलद्वारे भूगर्भाच्या आत अधिक जाणे शक्य झाले. त्यामुळे ५०, १००, २००, ८०० फुटावरील पाणी शेतीसाठी उपसले जाते. आता भूजलपातळीही घटू लागली आहे. अत्यंत आवश्यक घटक पाणीच मिळेनासे आणि मिळाले तरी ते अल्प बनले आहे. नद्यांचे पाणीही प्रदुषित झाले आहे.


बियाण्यांचा तुटवडा ही सुद्धा महत्वाची समस्या आहे. पूर्वी शेतकरी आपल्याला लागणाऱ्या बियाण्याची उगवण किंवा उपलब्धता स्वतःच करायचा. बाहेरचे (किंवा विकतचे) बियाणे, खते घेण्याची वेळ त्यावर येत नसे. मात्र, रसायनांच्या वापरामुळे हे गणितही बिघडले. आता शेतकऱ्याला सर्वच विकत घ्यावे लागते. पशुधनामुळे खतांची उपलब्धता होत असे. आता पशुधनही घटले. पूर्वी घरातील सदस्यच शेती कामात राबायचे. त्यामुळे शेतमजूर लावण्याची फारशी गरज नसे. आता शेतमजुराशिवाय कुठलेच काम होत नाही. आर्थिकदृष्ट्या शेतमजुरी सुदधा शेतकऱ्याला परवडत नाही. हवामान बदलामुळे निंदणी, खुरपणीसह औषधे आणि खतांची मात्रा देण्यासाठी मजूर वारंवार लागतो. शेतपिकांच्या काढणीसाठीही मजूर लागतात. शेतकरी आपल्याच खर्चातून कृषी उत्पादने विक्रीसाठी नेतो. तेथेही त्याच्या पदरी निराशाच पडते. कारण, त्याला योग्य भाव मिळत नाही. झालेला खर्चही वसूल होत नाही. कधी कधी खर्चा ऐवढेच पैसे मिळतात. शेतपिकांना भाव मिळण्यात कधी सरकार कारणीभूत ठरते, कधी व्यापारी तर कधी स्वतः शेतकरीच. हे चक्र काही थांबायला तयार नाही. 
सरकारच्या विविध योजना आहेत, अनेक घोषणा होतात, कर्जमाफी दिली जाते, कोट्यवधी खर्चिले जातात, हमीभाव जाहीर होतात पण प्रश्न जैसे थेच आहेत. काही दशकांशी तुलना करता त्यात तसूभरही बदल झालेला नाही. किंबहुना त्यात वाढच झाल्याचे शेतकरी सांगतात. विविध माध्यमांद्वारे होणारा हस्तक्षेप कृषी समस्यांना वाढीस घालतो आहे. जसे की निर्यातबंदी, खते किंवा बियाण्यांचा अल्प पुरवठा, वाहतुकीचा वाढलेला खर्च, हमीभाव असूनही तो न मिळणे असे एक ना अनेक.


कृषी क्षेत्र या गर्तेतून बाहेर पडणार की नाही? यावर तोडगा आहे. केवळ तात्कालिक उपाय (मलमपट्टी) करणे हा प्राथमिक आहे. जसे की हमीभाव वाढविणे, कर्जमाफी, पाणी आणि वीज मोफत देणे, कर कमी करणे, निवडणुकीसाठी अवास्तव आश्वासने देणे वैगेरे. मात्र, कायमस्वरुपी समस्या सुटण्यासाठी अत्यंत धाडसी आणि ठोस उपाययोजनांची गरज आहे. त्या कुठे आणि कशा होत आहेत? जगभरात अनेक ठिकाणी आशादायक बाबी घडत आहेत. कुठे, काय घडते आहे? कृषी समस्यांच्या निवारणासाठी नक्की काय करण्याची गरज आहे? त्याविषयी पुढच्या लेखात जाणून घेऊया….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *