कचरा वेचक ते अवकाश संशोधक – भारतीय महिलांचे भरगच्च योगदान

  • Home
  • Marathi Blogs
  • कचरा वेचक ते अवकाश संशोधक – भारतीय महिलांचे भरगच्च योगदान

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाविषयी प्रकर्षाने चर्चा केली जाते. खासकरुन भारतीय महिलांबाबत बोलायचे तर त्या स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि भारताच्या प्रगतीसाठी सतत सहनशील आणि तत्पर आहेत. मग कचरा वेचणे असो की चंद्रयानसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे प्रमुखपद. महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्याचा जागर आणि स्मरण सर्वांनीच करायला हवा.

डॉ. राजेंद्र शेंडे

मी स्वतः संयुक्त राष्ट्रात पॅरिसला काम करीत होतो. तेव्हा माझ्या तिन्ही बॉस या फ्रेंच महिला होत्या. महिला दिनानिमित्त एक बाब मला प्रकर्षाने सर्वांना सांगायची आहे ती म्हणजे, त्या कुठल्याही देशातील असोत, त्यांच्यातील क्षमता अचाट असते. कितीही बिकट परिस्थिती असली तरी भारतीय महिला तर हार बिलकुल मानत नाहीत. उलट प्रतिकुल परिस्थितीत त्यांची प्रतिभा अधिक लख्ख होते. उदाहरणच द्यायचे तर एखाद्या झोपडीतील कुटुंबाचे पाहुया. मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबातील पुरुष जर दारु पित असेल, दिवसाकाठी मिळालेल्या मजुरीचे पैसे दारुत खर्च करीत असेल तर कुटुंबासाठी फारसे पैसे उरत नाहीत. अशाही स्थितीत या पुरुषाची पत्नी कुटुंबाकडे विशेष लक्ष देते. उदरनिर्वाह चालू शकेल अशी तजवीज ती करते. मुलांचे पालनपोषण असो की पतीचे व्यसन, औषध-पाणी यासाठी ती कठोर मेहनत करते. म्हणजेच ती महिला अत्यंत धीर, संयम आणि कष्टाने कुटुंबाचा भार सांभाळते. कालांतराने ही मुलेच त्यांच्या कुटुंबाचे चित्र पालटतात.


इथे मला माझ्या आईविषयीही सांगावेसे वाटते. तिचं संपूर्ण आयुष्य ग्रामीण भागातच गेलं. ती शिक्षिका होती. घरात संगीताचं वातावरण. एकमेकांना समजून घेणे, कौटुंबिक जबाबदारीला प्राधान्य देणे, आपल्या परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याबरोबरच त्यांनी चांगले व्यक्ती बनावे यासाठी धडपडणे, माझ्या जडणघडणीवर विशेष लक्ष केंद्रित करणे अशा असंख्य जबाबदाऱ्या ती एकाचवेळी पण सक्षम पद्धतीने पार पाडत होती. निवृत्ती नंतरही पोस्ट विभागाच्या मदतीने माझ्या आईने कितीतरी कुटुंबांना पैशाची गुंतवणूक करण्याची सवय लावली. पोस्टाच्या ठेवी, योजनांचा प्रचार-प्रसार ती सतत करायची. याद्वारे त्या त्या कुटुंबाला त्यांचे आर्थिक नियोजन करता आले आणि त्यातून ते कुटुंब स्थिरावले, वेळेप्रसंगी कुणाकडे हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. केवळ शिक्षकीपेशा सांभळतानाच कौटुंबिक जबाबदारी आणि त्या जोडीला ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आर्थिक सुरक्षेची काळजी करण्याची आईची धडपड मलाही खुप ऊर्जा देऊन देते. माझी आई म्हणजे भारतीय महिलांच्या कार्याचे एक प्रतिकch आहे.


भारतात अनेक रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये आपल्याला कचरा वेचणाऱ्या महिला सहजच दृष्टीस पडतात. या महिला म्हणजे पर्यावरणाच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. कचरा हा जसा वाईट तसा तो सोनेही आहे. म्हणूनच या महिला आपला उदरनिर्वाह कचरा वेचून, कचऱ्याचे वर्गीकरण करुन आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कार्यात सहभाग घेऊन करतात. हे काम तसे निकृष्ट असले तरी त्या इमानेइतबारे त्याला न्याय देतात. कुठलीही तक्रार न करता त्या हे कार्य करतात. त्यामुळेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ध्येय आपण गाठू शकत आहोत. यातून स्वच्छता राखणेही शक्य होते आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतात कचरावेचक महिलांचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. मात्र, यात दुर्दैवाची बाब म्हणजे पुरुषांच्या तुलनेत या महिलांना मजुरी कमी मिळते. तेवढीच किंबहुना अधिक मेहनत करुनही त्यांच्या नशिबी मोबदला कमीच असतो. यावर समाजाने सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. आपले पंतप्रधान मोदींचा कचरा वेचणाऱ्या महिलांचा आणि वेगवेगळा करतानाचा फोटो पाहिला आहे का? मोदींची प्रशंसा करावी की त्या महिलांची असा संभ्रम होतो.


२०१०-११च्या कृषी जनगणनेनुसार, शेतकऱ्यांची संख्या ११८.७ दशलक्ष एवढी होती. त्यात महिला शेतकऱ्यांचे प्रमाण ३०.३ टक्के होते. तर, याच गणनेनुसार, देशात शेतमजुरांची संख्या १४४.३ दशलक्ष एवढी होती. त्यात महिला शेतमजुरांची संख्या तब्बल ४२.६ टक्के एवढी होती. या गणनेला जवळपास १३ वर्षे लोटली आहेत. या प्रमाणात लक्षणीय बदल झाला आहे. म्हणजेच शेतकरी आणि शेतमजूर महिलांचे प्रमाण vadhale आहे. विविध कारणांमुळे नैराश्य आलेले शेतकरी हे आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मात्र, महिला शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची वार्ता कधी कानी पडत नाही. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे त्यांच्या पत्नीने आपले कुटुंब सावरले, शेतीत लक्ष दिले, महिलांचा सांभाळ केला आणि आपले नशीब पालटले अशी उदाहरणे आपल्याला दिसून येतात. महिला शेतकरी या मनाने खंबीर आणि कष्ट करण्याच्या तयारीत असतात. प्रसंग कुठलाही असो त्याला तोंड देण्यासाठीचे धैर्य त्यांच्याकडे कुठून येते, असा प्रश्न मला नेहमी पडतो.


जगभरात भारताच्या चांद्रयान मोहिमेचा बोलबाला झाला त्यापेक्षा या मोहिमेची धुरा सांभाळणाऱ्या रितू करिधाल श्रीवास्तव या महिलेचा झाला. चांद्रयान मोहिमेचे नेतृत्व करुन त्यांनी संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मधील आकडेवारीवर एक नजर टाकूया. २०२२-२३च्या आकड्यांनुसार, संस्थेत एकूण १६ हजार ७९ जण आहेत. त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि प्रशासकीय कार्य करणारे सारेच आहेत. महिलांची संख्या ३१९९ एवढी आहे. आणि बहुतांशी त्या मोठ्या पदावर आहेत.
जगभरात लोकप्रिय असलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, भारतात केवळ ४ जाती आहेत. एक म्हणजे युवा, दुसरी म्हणजे नारी, तिसरा शेतकरी आणि चौथा गरीब माणूस. यामध्ये युवा शेतकरी आणि गरीब या जातीत देखील महिलांचे प्रमाण जास्त आहे! महिला या प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांना नमन करुनच आणि त्यांच्या शक्तीला पूर्णपणे वाव देऊनच आपण इच्छित साध्य करु शकतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *