दुबईच्या पर्यावरण परिषदेचे अंतरंग….

  • Home
  • Marathi Blogs
  • दुबईच्या पर्यावरण परिषदेचे अंतरंग….

आज ३० नोव्हेंबरपासून देशोदेशीचे नेते, प्रतिनिधी, उच्चस्तरीय अधिकारी या सर्वांचा दुबईत जणू कुंभमेळाच भरणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा परिषदेत सहभागी होणार असल्याचे जाहीर झाले आहे. अशाच पद्धतीने अनेक देशांचे प्रमुख तेथे येतील. तसं पाहिलं तर ही परिषद काही पहिल्यांदाच होत नाहीय. मग, यापूर्वी त्या झाल्या असल्या तरी यंदाची ही परिषद एवढी महत्वाची काय, या परिषदेचा आणि आपला (खासकरुन सर्वसामान्यांचा) संबंध काय, असे प्रश्न सहाजिकच विचारले जात आहेत.

आपण सर्वच जण कुठे राहतो असा प्रश्न कुणी विचारला तर आपले चटकन उत्तर असते ते म्हणजे, घरात, बंगल्यात, फ्लॅटमध्ये वैगेरे. पण, त्याचबरोबर आपण एका वातावरणात राहतो. जे वातावरण सर्वांसाठी सारखेच असते. म्हणजे, गरीब असो की श्रीमंत, सुशिक्षित असो की अशिक्षित अशा सर्वांसाठीच वातावरण सारखे असते. आणि हे वातावरणच सुरक्षित राहिले नाही तर… मग आपले जगणेही मुश्कील होईल. याचे कारण म्हणजे, आपण ज्या वातावरणात राहतो ते वातावरण आपल्या वसुंधरेचा एक घटक आहे. आणि आता पृथ्वीच तापाने फणफणते आहे. कारण, विकासाच्या मागे धावताना आपण ऊर्जा, उद्योग आणि विविध कारणांमधून धूर सोडतोय (हरित गृह वायूंचे उत्सर्जन). याच वायूंचे ढग पृथ्वी भोवती जमा झाले आहेत. आणि त्यातूनच वसुंधरेच्या सुखी-समाधानी वातावरणाला ग्रहण लागले आहे. यामुळेच हिमनद्यांचे वितळणे, समुद्र आणि महासागरांच्या पाणी पातळीत वाढ होणे, नैसर्गिक आपत्तींचे वादळ घोंघावणे अशी अनेक संकटे आ वासून उभी आहेत. हे सारे थांबवायचे असेल आणि आपल्या पुढील पिढ्यांना सकुशल बघायचे असेल तर काही तरी ठोस करणे आवश्यक आहे. यासाठीच ही परिषद महत्त्वपूर्ण आहे.

जगावर नजर टाकली की एक बाब लक्षात येते की, विविध देश हे विविध गटांमध्ये विभागले गेले आहेत. जसे, विकसीत देश, अविकसीत देश आणि विकसनशील देश. हेच प्रतिबिंब पर्यावरण परिषदेत दिसते. हरित गृह वायूंचे उत्सर्जन रोखायचे तर आपल्याला विकासकामे थांबवावी लागतील, अशी भीती अनेक देशांना वाटते. अविकसित आणि विकसनशील देशांना वाटते की जे विकसित देश आहेत त्यांनी हरित तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी निधी द्यायला हवा. तसेच, सर्वच देशांनी शाश्वत विकासाची वाट चोखाळायला हवी. याचसंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या चर्चा आणि वाटाघाटी या परिषदेत होणार आहेत. त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या परिषदेवर होणारी टीका, टिपण्णी, कौतुक, चांगले निर्णय, काही महत्त्वाच्या घोषणा, काही संकेत आणि बरेच काही महत्त्वाचे आहे. आणि याच परिषदेसंदर्भात मी आपल्याला माहिती देणार आहे.

तुम्ही बरेच जण मला जाणतात. मी मुंबई आयआयटीचा विद्यार्थी हे ही तुम्ही जाणता. माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी माझा सन्मान केला त्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतीलच. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण ओझोन कृती दलाचा प्रमुख म्हणून पॅरिसमध्ये दोन दशके जबाबदारी सांभाळली हेही माहित असेल. पण, मराठी बांधवांना पर्यावरणाविषयीचे माझे लेख जगभरात इंग्रजीसह विविध भाषांमध्ये प्रसिद्ध होतात हे माहित नसेल. क्वचित इतरांनी लिहिलेले मराठी मधील लेख आपल्या वाचनात येत असणार.

मुळात मी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा. त्यामुळे आता मी आपल्या मराठीजनांसाठी पर्यावरण-जनजागरण मराठीतच करण्याचे नियोजन केले आहे. म्हणूनच आता माझे मराठी लेख आपल्याला माझ्या वेबसाईटवर वाचायला मिळतील. ग्रीन तेर फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर विशेषतः तरुणांना शाश्वत विकासासाठी काय कृती करावी यासाठी अनेक कार्ये मी हाती घेतली आहेत. हळूहळू त्याविषयीही लिहीन.

पण तूर्तास आपल्यासाठी दुबईच्या पर्यावरण परिषदेचे अंतरंग उलगडण्याचे जरुरीचे कार्य मला पार पाडायचे आहे. ते सुफळ संपूर्ण होईल कारण आपल्या सर्वांचा प्रतिसाद आणि उत्सुकता मला अतिशय महत्त्वाची आहे. मी दुबईत प्रत्यक्ष सहभागी होत असलो व धावपळीत असलो तरी जरुरीची माहिती देत राहीन.

धन्यवाद.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *