आहार कोणता हवा? शाकाहार की मांसाहार?

  • Home
  • Marathi Blogs
  • आहार कोणता हवा? शाकाहार की मांसाहार?
Image Courtesy: Anthony Rahayel/ Pexels

सध्या शाकाहार आणि मांसाहार याविषयी वेगवेगळ्या संदर्भात आणि विचित्र कारणासाठी जोरदार (तसेच चवदारही) चर्चा सुरू आहे. कोणता आहार शरीराला आणि मनाला चांगला आहे, पुर्वी काय आहार असायचा, कोणत्या आहाराने आपले जीवन सुखी राहिल, बदलत्या काळात समतोल आहार कसा असावा असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आहाराचा आणि हवामान बदलाच्या संकटाचा अगदी निकटचा संबंध आहे, हे या वादात बरेच जण विसरुन जातात. संयुक्त राष्ट्राच्या अभ्यास गटाने यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात काय नमूद केले आहे, यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख….

मानवाच्या ज्या मूलभूत तीन गरजा आहेत त्यामध्ये अन्नाचा समावेश होतो. जीवन जगण्यासाठी मानवाला अन्नाची नितांत गरज आहे. आहार जितका चांगला तितकी मानवी शरीर प्रकृती सुदृढ असे समीकरण आहे. त्याबरोबरच मन निरोगी राहण्यासाठी पोषणमूल्य असलेला आहार घ्यावा, असे डॉक्टर सांगतात. ‘उदरभरण नोहे’, असे आपल्या गुरुंनी सांगून ठेवले आहे. कारण, अन्नातूनच मानवी शरीराला आवश्यक घटक (प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे, लोह आदी) मिळतातच पण त्यामधून मानसिक बळ देखिल वाढीस लागले पाहिजे. हेच घटक शरीरातील विविध अवयवांना आणि यंत्रणांना बळ पुरवतात. यातील कुठलाही घटक कमी वा अधिक झाला की त्याचा परिणाम शरीरातील विशिष्ठ अवयव, भाग किंवा यंत्रणेवर होतो. यातूनच  शारिरीक व मानसिक आजारी पडण्याची प्रक्रिया सुरू होते. मग, औषधांद्वारे संबंधित दोष दूर केला जातो. म्हणजेच, आपला आहार उत्तम असेल तर आपले शरीर निरोगी राहते. हे सारे विस्ताराने सांगण्याचे कारण हेच की, सध्या चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे आहार कोणता असावा, शाकाहार की मांसाहार?

शाकाहार म्हणजे वनस्पती, पाने, फुले, फळे, कंदमुळे आदींच्या माध्यमातून बनविण्यात आलेले अन्न. तर, मांसाहार म्हणजे, प्राणी, पक्षी, जलचर यांच्या मांसाद्वारे बनविण्यात आलेले अन्न. याविषयी आहाराचे बरेच प्रकार आहेत. दुधाशिवाय आहार, मिश्र आहार, संतुलित आहार इत्यादी. खाण्याची प्रथा अनादी काळापासून बदलत आलेली आहे. इतिहासाची पुस्तके आणि प्राचीन धर्मग्रंथांमध्ये देव, उपासना, नीतिशास्त्र, सामाजिक वर्तन आणि विविध काळातील जीवन जगण्याच्या पद्धती याविषयी तात्विक वर्णन आहे.

खाण्याच्या पद्धती देखील काळानुरूप बदलल्या आहेत. केवळ शाकाहारी आणि मांसाहारी अन्नच नव्हे तर कृषी आणि प्राणी अन्न कसे वाढवायचे, ते कसे तयार करायचे हे देखील बदलले. मानव प्रथम गुहेबाहेर आले ते अफ्रिकेमध्ये ३ लाख वर्षापूर्वी. त्यावेळेस तो प्राण्यांची शिकार करुनच जगत होता. अफ्रिकेच्या बाहेर मानवाचे स्थलांतर झाले आणि तो जगभर पसरला. हिमपर्व संपले आणि १२ हजार वर्षापूर्वी शेती करु लागला. सहाजिकच तो प्राण्यांबरोबर वनस्पतींचेही सेवन करु लागला. भटक्या जमातीतील मानवाला त्यानंतर शेतीची आवड वाटू लागली. तो शेत-शिकारी झाला. त्यानंतर तो शेतकरी बनला.

एक शास्त्रज्ञ म्हणून मला असे वाटते की, त्या त्या वेळच्या परिस्थितीने मानवाच्या सवयी ठरवल्या. सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष दिले तर असे दिसेल की दळणवळण जसे वाढते, तसे आपण इतर संस्कृतीच्या जवळ आलो. उदाहरणार्थ, पाश्चात्य आहाराच्या प्रभावाने आपण पाश्चात्य खाद्यपदार्थात आणले. त्यामुळे आपण ज्वारी-बाजरीसह इतर विविध तृणधान्ये (मिलेटस) विसरलो. वनस्पतीपासून होणाऱ्या पौष्टिक अन्नापासून वंचित झालो. अर्थात आता वाढत्या आरोग्य तक्रारींमुळे पुन्हा तृणधान्यांकडे अनेकांचा कल वाढत आहे.

आहार हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. तो कसा असावा हे त्या त्या भागातील किंवा प्रदेशावर अवलंबून असतो. जसे की कोकणातील नागरिक हे समुद्रातील जीवांवर आधारीत अन्न ग्रहण करतात. तर राजस्थान सारख्या वाळवंट असलेल्या भागातील नागरिकांचा आहार हा कमी पाण्यावर वाढणाऱ्या वनस्पती-प्राण्यांवर अवलंबून आहे. हिमालयातील बर्फाच्छादित किंवा थंड हवेच्या भागातील नागरिक हे याक, बकरी यांचे मटण खाणे पसंत करतात. तर, खडकाळ आणि अवर्षण भागातील नागरिक हे तेथे पिकणाऱ्या ज्वारी, बाजरी सारख्या अन्नधान्यावर गुजराण करतात. परिणामी, या साऱ्यांचाच आहार हा वेगवेगळा आहे. त्या त्या भागात उपलब्ध असलेल्या संसांधनांचा प्रभाव आहारावर दिसून येतो. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचा आहार आणि जंगलात राहणाऱ्यांच्या अन्नातील घटक हे भिन्न असतात. नदीमध्ये मिळणाऱ्या मासे आणि जलचरांचा आहारात समावेश असतो. तर, जंगलातील आदिवासी हे तेथील रानमेवा म्हटल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अन्न म्हणून वापर करतात. म्हणजेच त्या त्या भागातील भौगोलिक, पर्यावरणीय आणि नैसर्गिक घटक कोणते यावर आहाराचे संलुतन ठरते. जिभेच्या संवेदना देखील महत्वाच्या ठरतात.   

आज मानवजातीला हवामान संकटाने घेरले आहे. त्यामुळे जागभरातच मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आता भीती ही आहे की,  माणूस पुन्हा गुहेत जाऊन स्वतःला बंद करेल. बाहेर येईल ते फक्त ताजी हवा आणि ताजे अन्न मिळवण्यासाठीच. विविध प्रकारच्या मानवी कृतींमुळे निसर्गाचे चक्रच बिघडले आहे. मग, त्यात जलचक्र असो, नायट्रोजन किंवा कार्बनचे चक्र. सारेच कसे विस्कळीत झाले आहे. यातूनच हवामानाचे संकट आ वासून उभे ठाकले आहे. पृथ्वी ही डळमळीत झाली आहे. 

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) या संयुक्त राष्ट्राच्या समितीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात एक अहवाल (सहावा मूल्यांकन अहवाल AR6) प्रसिद्ध केला. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरणविषयक कार्यक्रम (UNEP) आणि जागतिक हवामान संघटना (WMO) यांनी आयपीसीसीची स्थापना केली आहे. (मी चौथ्या अहवालाचा AR4 प्रमुख समन्वयक लेखक होतो.) हवामान बदलाचे संकट टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतींसाठी ठोस निर्णय घेणे अगत्याचे आहे. यासाठीच दुबईतील हवामान परिषदेत (COP28) आयपीसीसीचा AR6 हा अहवाल महत्त्वाचा आधार होता. कृषी क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, अधिकाधिक वनस्पती-आधारित आहाराकडे वळणे आणि औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेत जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या खाली ठेवणे या पॅरिस कराराचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा अहवाल सूचवतो.

पशुपालन आधारीत शेतीमुळे २० टक्के कार्बन उत्सर्जन होते. त्यामुळेच धान्य, सोयाबीन, कडधान्ये, फळे, भाज्या यावर आधारीत नैसर्गिक शेती व आहाराकडे वळल्याने आपण हे उत्सर्जन कमी करू का? खरे सांगायचे तर, आहारातील बदलाबरोबरच कृषी क्षेत्रातील पारंपरिक पद्धतीतही अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे. जसे की, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जाणिवपूर्वक वापर, वाहतूक संबंधित वायू उत्सर्जन टाळण्यासाठी कृषी उत्पादनांचे स्थानिकीकरण, गुणवत्ता सुनिश्चित करणे यासारख्या शाश्वत कृषी पद्धतींचा त्यात समावेश आहे. माती, पाणी आणि सर्वच नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आपण कसोशीने टाळला पाहिजे. 

मानवी आहार कसा असावा याबाबत आयपीसीसी “संतुलित आहार”ची शिफारस करते. आयपीसीसीने अहवालात याविषयी स्पष्टपणे काही बाबी नमूद केल्या आहेत. संतुलित आणि शाश्वत आरोग्यदायी आहार, अन्नाची हानी व नासाडी टाळणे, पर्यावरण आणि जैवविविधतेची हानी रोखणे, यावर अहवालात जोर देण्यात आला आहे.

“संतुलित आहार” म्हणजे नेमके काय? हा असा आहार आहे ज्यात वनस्पती-आधारित खाद्यपदार्थ असतात. जसे की भरड धान्य, शेंगा, फळे आणि भाज्या, तृणधान्य आणि बिया, लवचिक, टिकाऊ आणि हरित गृह वायूंचे उत्सर्जन न करणारे प्राणी-स्रोत अन्न. असंतुलित आहारामुळे अशाश्वत शेतीचा विस्तार होतो. पर्यावरण आणि मानवी असुरक्षितता वाढवतो. जमीन तसेच जलस्रोतांसाठी पराकोटीची स्पर्धा निर्माण करतो.  अन्नाचा अपव्यय तर होतोच पण मांस भक्षणामुळे नेमके पर्यावरणाचे काय नुकसान होते हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे. ज्या प्राण्यांचे मांस आपण खातो ते प्राणी वनस्पतींवर जगतात. म्हणजेच वनस्पती आणि प्राणी हे दोन्हीही नष्ट होतात. यातूनच जवळपास ९० टक्के ऊर्जा नष्ट होते.

मला वाटते की, विज्ञान स्पष्ट आहे आणि करावयाच्या कृतींबद्दलचा संदेशही अधिक स्पष्ट आहे. कोणता आहार घ्यावा शाकाहारी की मांसाहारी या फालतू वादात गुंतणे व्यर्थ आहे. आपण सर्वांनी आपल्या आहारात आणि वागण्यात ‘हवामानवादी’ बनले पाहिजे. म्हणजेच, आपला आहार हा ‘हवामानहारी’ असायला हवा. असा आहार की ज्यामुळे पर्यावरणाचे कुठलेही नुकसान होणार नाही. हवामान बदलाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करायचा असेल तर त्याला स्थानिक पातळीवरील कृतीच प्रभावी ठरतील. ‘हवामानहारी’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शाश्वत विकासासाठी आपण संतुलित आहाराचा स्वीकार करणे हीच काळाची गरज आहे. अन्यथा आपल्या पुढील पिढ्या या आहारासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठीच प्रकर्षाने झुंजतील.

—  
डॉ. राजेंद्र शेंडे
shende.rajendra@gmail.com

(लेखक हे ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक संचालक, आयपीसीसी अहवाल २००७चे समन्वयक प्रमुख लेखक, युनेपचे माजी संचालक आणि वैश्विक ओझोन कृती समितीचे माजी प्रमुख आहेत.)

(शब्दांकन – भावेश ब्राह्मणकर)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *